Ad will apear here
Next
संक्षिप्त भगवद्गीता (पूर्वार्ध)
भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा


आज गीता जयंती. भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा असलेली श्रीमद्भगवद्गीता केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर सर्व जगातील जाणकारांच्या हृदयात मोठ्या आदराने विराजमान झालेली आहे. अनेक विद्वानांनी सोप्या भाषेत गीतेचा अर्थ सांगण्याचे प्रयत्न आजवर केलेले आहेत. त्याच्या अभ्यासातून ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी काढलेले १८ अध्यायांचे सार लिहिले आहे. त्याचा हा पूर्वार्ध... 
............
मोक्षमार्गाचे अर्थात ज्ञानमार्गाचे उद्बोधन करणारी प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद्भगवद्गीता. यांपैकी गीता केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर सर्व जगातील जाणकारांच्या हृदयात मोठ्या आदराने विराजमान झालेली आहे. पसायदानातील ‘आणि ग्रंथोप-जीविये’प्रमाणे शेकडो वर्षे लाखो लोक आपापल्या कुवतीप्रमाणे गीतेचा अभ्यास आणि त्यावर विवेचनात्मक लेखन करत आहेत. त्यावर पीएचडीचे शेकडो ग्रंथ सिद्ध झाले आहेत. 

महर्षी वेदव्यास रचित महाभारतात गीतेचा समावेश आहे. त्यात एकूण ७०० श्लोक आहेत. कुरुक्षेत्रातील रणभूमीवर कौरव-पांडव एकमेकांशी लढण्यासाठी सज्ज झाले असताना, समोर सगळे आप्त-स्वजन बघून अर्जुनाची मती कुंठित होते. त्यांच्याशी लढण्यापेक्षा मरण पत्करले, अशी त्याची धारणा होते. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण त्याला तत्त्वज्ञानाच्या आधारे स्वधर्म व कर्तव्याचे बोधामृत पाजतात आणि अर्जुनाचे डोके ठिकाणावर येऊन तो युद्धाला तयार होतो.



अनेक विद्वानांनी सोप्या भाषेत गीतेचा अर्थ सांगण्याचे प्रयत्न आजवर केलेले आहेत. विनोबाजींची ‘गीताई’ आणि ‘गीता प्रवचने’ प्रसिद्धच आहेत. ज्ञानेश्वरांनी गीतेवर ‘ज्ञानेश्वरी’तून भाष्य केले. त्यावर वै. सोनोपंत दांडेकर, स्वामी स्वरूपानंद, बाबाजीमहाराज पंडित, साखरेमहाराज इत्यादींनी पद्यमय, अधिक सुबोध रचना केल्या. त्यांची पारायणे आणि अभ्यास अखंड चालू असतो. काहींनी सारररूप १०८ श्लो क निवडले, तर काहींनी फक्त १८ महत्त्वाच्या श्लो कांमधून गीतेचे मर्म उलगडले. आपण या ठिकाणी, प्रत्येक अध्यायामधून एक किंवा अधिक श्लो क घेऊन, एकूण १८ अध्यायांचे सार काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. अधिकारी लेखकांच्या विवेचनाचा आधार घेऊनच हा ‘प्रपंच’ करणार असल्यामुळे, जे काही लिहिले जाईल ते ‘पत्रं, पुष्पं, फलं, तोयं’ इत्यादी साहित्याने यथासंभव ईश्वराची पूजा केल्याप्रमाणे, गीतेची आराधनाच असेल. प्रत्येक श्लोकाचा शब्दार्थ नव्हे तर भावार्थ दिलेला आहे.

अध्याय पहिला : अर्जुनविषाद योग 

युद्धाचा पहिला दिवस आहे. कौरव-पांडव सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. शत्रुपक्षात आपलेच स्वजन पाहून अर्जुन शस्त्र खाली ठेवतो आणि स्वस्थ बसून राहतो. येथे कोणतेही तात्त्विक प्रतिपादन नाही. त्यामुळे एकही श्लोक निवडलेला नाही.

अध्याय दुसरा : सांख्ययोग

या अध्यायात चार श्लोक महत्त्वाचे आहेत.

वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णानि नरोपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही।। (२२) 

भारतातील तत्त्वज्ञानात पुनर्जन्माला मान्यता आहे. माणूस जुनी वस्त्रे टाकून जशी नवी परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर सोडून नव्या देहाशी संलग्न होतो. सर्व देहांतील आत्मा नित्य, एकच एक असतो.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:॥ (२३)

आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवत नाही किंवा वायू सुकवत नाही. असा हा आत्मा स्थिर, सर्वव्यापी आणि कालातीत आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्व कर्मणि॥ (४७)

कर्म करणे हाच आपला अधिकार आहे. फळाबद्दल अपेक्षा ठेवणे योग्य नाही. शुभाशुभ कोणतेही फल मिळू शकते. म्हणून फळाबद्दल मनात हेतू नसावा आणि कर्म न करण्याचा आग्रहही नको.

एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति।
स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति॥ (७२)

स्थितप्रज्ञाला एकदा आध्यात्मिक उच्च अवस्था प्राप्त झाली, की तो पुन्हा मोहित होत नाही. अंतकाली ही स्थिती प्राप्त झाल्यास त्याला अखंड ब्रह्मानंद आणि जन्ममरणापासून मुक्ती मिळते.

अध्याय तिसरा : कर्मयोग 

अन्नाद्भवति भूतानि पर्जन्यादन्नसंभव:।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव:॥ (१४)

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌।
तत्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌॥ (१५)

अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात; पावसापासून अन्नपदार्थ निर्माण होतात. ही पर्जन्यवृष्टी यज्ञामुळे होते. कर्माच्या योगाने यज्ञ संपन्न होतो. परमात्म्याच्या इच्छेने कर्म उत्पन्न होते. परमेश्वर हा सत्-चित्-आनंद स्वरूपातून प्रकट होतो. म्हणजेच सर्वव्यापक ईश्वरी तत्त्व यज्ञातच नेहमी विराजमान असते. 



अध्याय चौथा : ज्ञानकर्मसंन्यास योग 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌॥ (७)

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ (८)

समाजात नीती, विवेक आणि सुयोग्य आचरण (म्हणजेच धर्म) यांचे भान नाहीसे झाल्यानंतर, बेबंदशाही निर्माण झाल्यावर पुनर्स्थापना करण्यासाठी ईश्वरी अवतार प्रकट होतो - जन्म घेतो. सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी ईश्वर युगायुगांत अवतीर्ण होत असतो.

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञ: परंतप।
सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ (३३)

द्रव्यदान, यज्ञयागांपेक्षा ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे कर्मबंध नाहीसा होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते. जन्ममरणाच्या चक्रांतून मुक्तता होते - मोक्ष प्राप्त होतो.

अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग 

कामक्रोधविमुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌॥ (२६)

ज्याने काम-क्रोधास पूर्ण जिंकले आहे आणि ज्याचे चित्त पूर्ण स्थिर झाले आहे (निश्चआलमानस), अर्थात ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, अशा मुक्त व्यक्तींच्या सन्निध ब्रह्मानंद सदैव असतो.

अध्याय सहावा : आत्मसंयमयोग

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन:॥ (५)

माणसाने स्वत:चा उद्धार स्वत:च केला पाहिजे. अधोगतीला जाऊ नये (अनिष्ट आचरण करू नये). आपणच आपला हितकर्ता (बंधू) आणि अहितकर्ता (शत्रू) असतो.

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।
तस्याहं न प्रणश्यामि, स च मे न प्रणश्यति॥ (३०)

जो सर्व सजीव-निर्जीव सृष्टीला परमेश्वराचे रूपच समजतो आणि परमेश्वरात सर्व सृष्टी भरलेली आहे असे पाहतो, तो आणि प्रत्यक्ष परमेश्वर अभिन्नच असतात. ते एकमेकांना अंतरत नाहीत.

अध्याय सातवा : ज्ञानविज्ञान योग 

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत:॥ (३)

आत्मज्ञानाच्या (ज्ञानविज्ञान) प्राप्तीसाठी हजार जणांत एखादाच प्रयत्न करतो आणि अशा हजारो लोकांपैकी एखाद्यालाच यथार्थ ज्ञान (ईश्वरी साक्षात्कार- आत्मज्ञान) प्राप्त होते. (इतके ते दुर्मीळ आहे). 

अध्याय आठवा : अक्षरब्रह्मयोग 

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते।
भूतभावोद्भवकरो विसर्ग: कर्मसंज्ञित:॥ (३)

ब्रह्म म्हणजेच श्रेष्ठ, शुद्ध आणि अविनाशी तत्त्व; अध्यात्म म्हणजे जीवात्मभाव (उपाधीरूपी प्रकृती). नाना पदार्थांना उत्पन्न करणारा आणि त्यांचा विस्तार करणारा सृष्टीचा व्यापार म्हणजेच कर्म होय.

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम्‌।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम॥ (२१)

प्रकृति-प्रपंचाहून पूर्ण वेगळ्या, श्रेष्ठ अशा अव्यक्त तत्त्वाला अक्षर (अविनाशी) असे म्हणतात. त्यालाच परम (उच्चतम) गती म्हणतात. जी प्राप्त झाल्यावर पुनरावृत्ती (जन्ममृत्युचक्र) होत नाही, तेच परमात्म्याचे श्रेष्ठ स्थान होय.

अध्याय नववा : राजविद्याराजगुह्ययोग 

पिताहमस्य जगतो माता धाता पितामह:।
वैद्यम पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च॥ (१७)

परमेश्वर (परमात्मा) हाच जगताचा पिता (निमित्त कारण), माता म्हणजे उत्पत्तीचे स्थान (उपादान कारण), धारण करणारा आणि पितामह म्हणजे आजोबा (माता-पित्यांचे आदिकारण) आहे. त्यालाच (ब्रह्माला) जाणायचे आहे. ओंकार, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे सर्व तो एक परमेश्वरच आहे. 

अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌॥ (२२)

जे लोक परमेश्वराचे अनन्यभावाने चिंतन (उपासना) करतात, त्या भक्तांचे (कर्मयोग्यांचे) ईश्वर प्रपंचात संरक्षण करतो आणि अलभ्य ब्रह्मज्ञानाची प्राप्तीदेखील करून देतो.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌॥ (२७)

आपण जे जे काही कर्म करू, जे सेवन करू - हवन करू, अर्पण करू वा व्रतांचे आचरण करू, ते सर्व निष्काम, शुद्ध भावाने परमेश्वराला अर्पण करावे.

(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(श्रीमद्भगवद्गीता, तसेच संबंधित पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ‘गीताबोध’ हे गीतेबद्दलचे वेगळ्या प्रकारचे इंग्रजी पुस्तक लिहिणारे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व उदय करंजकर यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZJXBT
Similar Posts
संक्षिप्त भगवद्गीता (उत्तरार्ध) आज गीता जयंती आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सार लिहिले असून, त्याचा पूर्वार्ध आपण याआधी पाहिला. त्याचा उत्तरार्ध आता पाहू या...
काश्मीर शैवमत ऋग्वेदात रुद्रदेवतेचे स्तवन आहे. त्या काळापासून शंकराला उत्पत्ती आणि विनाश करणारा सर्वश्रेष्ठ देव मानण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. त्यालाच शैवमत असे म्हणतात. भारतात शैवमताचे अनेक उपपंथ आहेत. काश्मीर शैवमत ही त्यातीलच एक प्रसिद्ध परंपरा आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत काश्मीर शैवमताबद्दल
संपूर्ण सृष्टीची उभारणी ज्यांच्या द्वारे होते ते पंचीकरण भारतीय तत्त्वज्ञानात ‘पंचीकरण’ हा फार महत्त्वाचा विषय आहे. पाच प्रकारची विभागणी असा त्याचा सोपा अर्थ आहे. ‘पंचीकरण’ नीट समजावून घेणे मात्र अवघड आहे. ते एकदा समजले, की अध्यात्माचा अर्थात (आत्म) ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ झालाच म्हणून समजा. आपण त्याची थोडी वाटचाल करू या. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज त्याबद्दल लिहीत आहेत
वेदप्रणित अग्निहोत्र उपासना ‘अग्निहोत्र’ हा आपल्या घरी नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळी करण्याचा यज्ञविधी आहे. स्थानिक वेळेनुसार सूर्योदय व सूर्यास्ताला तो करावयाचा असतो. भारताबरोबरच जगातील बहुसंख्य देशांमध्ये त्याचा प्रसार झाला असून, लाखो लोक श्रद्धापूर्वक हे अग्निपूजन करतात. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात या वेळी लिहीत आहेत अग्निहोत्र उपासनेबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language